आरोग्य म्हणजे शरीर स्वास्थ्य, मनोस्वास्थ्य, स्वतः चे आणि कुटुंबाचे. घरातील एक व्यक्ती आजारी पडली तर सर्वांनाच त्याचा त्रास होतो.धावपळ, औषधांची व्यवस्था, डॉक्टरांचा सल्ला, गरज भासल्यास हॉस्पिटलची पायरी देखील चढायला लागते.अनेक कुटुंबामध्ये वैद्यकीय mediclaim असले तरी देखील आजारी न झाल्यास अतिउत्तम. कार्यक्षमता कमी होणे, आर्थिक भार होणे, इ. अवस्था निर्माण होण्याऐवजी आपण सर्व सुदृढ कसे होता येईल याचा प्रयत्न करूया.
कोरोना व्हायरस मुळे आधीच सर्व जग अक्षरश: हादरले आहे. परंतु त्याबरोबर जीवनशैलीमुळे निर्माण झालेली स्थूलता, मधुमेह टाईप २, उच्चरक्तदाब, हृदयविकार ह्या आजारांनी देखील घरी एका व्यक्तीला त्रस्त केले आहे.
योगायोगाने २३ मार्च हा मधुमेह दक्षता दिवस म्हणून ओळखला जातो. ह्या दिवशी आम्ही डॉक्टर एक अलार्म किंवा गजर वाजवतो.- आरोग्य गजर! चला जागे होऊया आपले आरोग्य आपल्याच हातात आहे.
आजपासून काही नियम सुचवते ते पाळूया -
- रोजच्या जेवणामधून साखरेला वजा करावे. त्याऐवजी क्वचित थोडा गूळ अथवा मध वापरू शकतो. पण वजन कमी करायचे असल्यास हा नियम आवश्यक आहे.
- पाणी म्हणजे जल, नीर, आप.
मनुष्य एकवेळ अन्नाशिवाय जिवंत राहू शकतो परंतु पाण्याशिवाय सर्व जीवसृष्टी नष्ट होईल. आपल्या शरीरामध्ये ६०% पाण्याचा अंश आहे.ह्या जलसंजीवनीला प्राथमिक व अतिमहत्त्वाचे पेय म्हणून वापरावे. दिवसातून २.५ ते ३ लिटर पाणी आरोग्य वर्धक ठरते.
त्यामध्ये लिंबू, मोसंबीचा रस, पुदिना, तुळस,कोरफड, आवळा, दालचिनी इ. घातल्यास Antioxidants युक्त पाणी आरोग्यास अति उत्तम.
- संतुलित आहार व त्याचे नियोजन आवश्यक.
रंगीत भाज्या, फळे, सलाड, इत्यादी उपलब्ध असताना देखील वडापाव, सामोसा, बर्गर, केक असे पदार्थ आपल्याला आकर्षित करतात. पण आपल्याला संयम बाळगून संतुलित आहार अंगीकृत केला पाहिजे. अन्यथा ह्या पदार्थांमुळे रक्तवाहिन्यांवर कोलेस्टेरॉलचे थर चढायला लागतात. आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
- बरोबरीने तंबाखू, गुटखा, मद्यपान, धूम्रपानाचे सेवन देखील सोडून दिले पाहिजे. अन्यथा लहान वयातच हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक/ पॅरालिसिस Bronchitis सारखे आजार पाठीस लागतात.
- नियमित व्यायाम....
व्यायाम लभते स्वास्थ्यम, आरोग्यम बलं सुखं !.
रोज ३० मी. व्यायाम करण्याचा पण घरातील लहानांपासून थोरा मोठ्या पर्यंत करणे सहज शक्य आहे. वैद्यकीय सल्ल्यानुसार व्यायाम केल्यास अधिक उपयुक्त ठरतो. चपळता, हृदयाची ताकद, स्नायूंची बळकटी, सांध्याचे आरोग्य यासाठी व्यायाम जीवनाचा अविभाज्य घटक आहे. केवळ ३०-४० मी. दररोज देणे मुळीच कठीण नाही.
- आपल्या देशात सर्वाधिक जास्त उत्पादन होते ते म्हणजे वनस्पती व मसाले. त्यातील हळद, मोहरी, हिंग, कढीपत्ता, इ. गोष्टींचे आरोग्यवर्धक गुण सर्वांना माहिती आहेतच. भारतीयांना curry eaters म्हणून ओळखतात. पण ह्याच करीमध्ये सर्व Antioxidants आहेत. आपण करी कमी आणि Hurry, Worry करतो त्यामुळे आजार मागे लागतात.
- सर्वात शेवटी आपण लक्ष देऊया आपल्या वजनाकडे. केवळ ५००/- / ६००/- रु चा बेसिक वजन काटा घरातील अति मौल्यवान वस्तू. आठवड्यातून किमान एकदा वजन मोजावे आणि ते जास्त असल्यास कमी करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करावे. व्यायाम, आहार नियोजन, मानसिक ताणतणाव, कमी करण्याचा प्रयत्न आणि योग्य वैद्यकीय उपचारांमुळे आपण हे चुकलेल्या जीवनशैलीचे विकार आपल्या दारातून बाहेर ठेऊ शकतो.
- डॉ. अश्विनी जोशी